सिंधुदुर्ग - महात्मा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहात तळकोकणातून महत्वाची भूमिका बजावणारा वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथील मिठागर व्यवसाय सध्या कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आला आहे. गेल्या महिन्याभरापासुन मीठ जाग्यावर पडून असल्याने मिठागरात मिठाचे ढिग पहायला मिळत आहेत. मिठाचा उपयोग खाद्यपदार्थांच्या सोबतीनेच कोकणात माड आणि अन्य बागायतीत केला जातो. मिठामुळे जमिनीतील वाळवी व अन्य उपद्रवी कीटक मरत असल्याने बागायतदार येथील मीठ मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असतात.
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून देशात लॉकडाऊन, आणि संचारबंदी केली आहे त्यामुळे मिठाला उचल नसल्याने मिठ उत्पादक शेतकरी हवालदील झाले आहेत. तसेच बाजारपेठा बंद असल्याने मिठाला मागणी नाही. शिरोड्यात पाढरे आणि काळे मीठ तयार केल जाते. अवकाळी पाऊस आणि दमट वातावरण असल्याने मीठ तयार व्ह्यायला उशिर लागत असल्याने मीठ उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.
शिरोडा मिठागराचा इतिहास -
स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर, महात्मा गांधी नागरी अवज्ञा चळवळीचे नेतृत्व करीत होते. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मिठावर लादलेला कर संपुष्टात आणण्यासाठी गुजरातच्या दांडी येथे गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. शिरोडा येथे आचार्य धरमंद कोसंबी, आचार्य जावडेकर, डॉ. भाग्यूवाट, अच्युत्रेय पटवर्धन, कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन, देवदास रानडे, मामासाहेब देवगिरीकर यांच्या नेतृत्वात अशीच कृती झाली. दिवाणी उल्लंघन चळवळीची ही शिरोडा आवृत्ती १२ मे १९३० रोजी सुरू झाली तेव्हा ९० सत्याग्रहिंना अटक करण्यात आली होती. याच परिसरात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वी. स. खांडेकर यांचे साहित्य बहरले.
शिरोडा येथे 6 ते 8 मिठागरे आहेत. मात्र, सद्यपरिस्थितीत हे सर्व मीठ उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. मीठ उत्पादनासाठी साधारणपणे डिसेंबरपासून सुरुवात होते. एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पन्न मिळते. पूर्वी सर्वसामान्यपणे जेवणात मीठागरातील चाड्या व बारीक मीठाचा वापर केला जात होता. तसेच त्या काळात मीठाची मागणी मोठ्या प्रमाणावर होती. परंतु, सध्या बाजारात विविध कंपन्यांचे तयार मीठ उपलब्ध होत असल्याने या मिठाची मागणी घटली आहे. रेडी येथे टाटा कंपनी कार्यरत असताना येथील मिठागरांमधील सर्व मीठ खरेदी करीत होती. तसेच जिल्ह्याबाहेरही शिरोडा मीठागरातून मीठ जात होते. आता केवळ फळझाडांना लागणारे खतयुक्त मीठाला मागणी वाढत असली तरी त्याचा उत्पादन खर्च परवडणारा नसल्याचे मीठ उत्पादक सांगतात. त्यातच कोरोनाच्या संकटाने मीठ उत्पादकांना चांगलेच घेरले असून शासन यांना मदत करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.