सिंधुदुर्ग - कणकवली येथे महामार्ग चौपदरीकरणाच्या कामत प्रशासन,सत्ताधारी आणि पालकमंत्री जनतेचे प्राण जाण्याची वाट पाहत आहेत काय ?असा संतप्त सवाल आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने प्रत्येक वेळी पोलीस संरक्षण देऊन काम सुरू केले. त्यामुळेच ठेकेदार कंपनीचा माज वाढला आहे. ठेकेदारावर योग्य कारवाई होईपर्यंत आणि कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत उड्डाण पुलाचे काम होऊ देणार नसल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ क्लिप जारी केलीय.
जीव जाण्याची वाट पाहताय का?
आज पुन्हा एकदा कणकवलीतील उड्डाण पुलाचा एक भाग कोसळला. ही घटना कधी दुर्घटना म्हणून पुढे येईल हे सांगता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा या निकृष्ठ कामसंदर्भात आवाज उठवतो तेव्हा पोलीस संरक्षणात काम सुरू केले जाते. प्रशासन काही बोलत नाही. कोणताही दंड ठोकत नाही. प्रशासन, सत्ताधारी आणि पालकमंत्री यांना या उड्डाणपुलात कोणाचे तरी प्राण गेले पाहिजेत काय ? त्याचीच ते वाट पाहत आहेत, असे आता वाटायला लागले आहे.
आम्ही जेव्हा यांना रोखतो त्यांच्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा आमच्यावर ३५३ सारखे गुन्हे दाखल केले जातात. खरं पाहता प्रशासनाच्या संरक्षणामुळेच ठेकेदार कंपनीचा माज वाढलेला आहे. ठेकेदारावर योग्य कारवाई होईपर्यंत आणि कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत उड्डाण पुलाचे काम होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओतून दिला आहे.