सिंधुदुर्ग - चिपी विमानतळ उदघाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी चिपी विमानतळ प्रकल्पाला भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी एटीएस टॉवरची तसेच विमानतळाच्या यंत्रणेची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिले.
महावितरण व बीएसएनएल विभागाने कामे पुर्ण करावी -
कोणत्याही परिस्थितीत २० जानेवारी २०२१ रोजी चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करण्याचे टार्गेट आहे. ४ जानेवारीला अलायन्स कंपनीचे पथक याठिकाणी येणार आहे. त्यामुळे येत्या २० जानेवारीपर्यंत या प्रकल्पाला डीजीसीएची परवानगी मिळालीच पाहिजे. त्यादृष्टीने महावितरण व बीएसएनएल विभागाने किरकोळ कामे पुर्ण करून घ्यावीत, अशा सूचना त्यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना दिल्या.
पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे -
पहिले येणारे विमान अलायन्स कंपनीचे ७० सीटचे असेल. आम्हाला उद्घाटनापेक्षा ऑपरेशन सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. चिपी विमानतळ प्रकल्पाला आवश्यक असणारा पाणी पुरवठा कुडाळ येथील बंधाऱ्यातून केला जाईल. येत्या आठवड्यात पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू होऊन लवकरच पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत असेही ते म्हणाले.
चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे -
पिंगुळी-पाट ते चिपीकडे येणारा रस्ता सुस्थितीत होणे गरजेचे आहे. याकडे लक्ष वेधताच राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून काम हाती घेण्याबाबत सूचना केल्या. यावेळी आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर यांनी विमानतळ प्रकल्पाची पूर्ण झालेली यंत्रणा दाखवत आम्ही पुर्ण क्षमतेने सज्ज असल्याचे सांगितले.
हेही वाचा - पीएफ खात्यावर ८.५ टक्क्यांचे व्याज १ तारखेपासून होणार जमा