सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत सत्ताधाऱ्यांनी अनेक तारखा दिल्या, मात्र अद्यापही या विमानतळाला मुहूर्त सापडलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या दौऱ्यात चतुर्थीच्या आधी हे विमानतळ सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र भाजपा खासदार नारायण राणे यांनी अपूर्ण कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे विमानतळ सुरूच होणार नाही, असे म्हटले आहे. विमानतळ सुरू होण्याच्या अनेक तारखा जाहीर करणाऱ्या शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा लवकरच हे विमानतळ सुरु होईल, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांसह तीन नेत्यांची तीन विधाने
चिपी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळ विविध कारणांसाठी चर्चेत आहे. अलीकडे हे विमानतळ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा नेते नारायण राणे एकमेकांवर या विमानतळाच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप करत आहेत. अलीकडेच तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चतुर्थीपर्यंत हे विमानतळ सुरू होईल असे संकेत दिले आहेत. तर खासदार नारायण राणे यांनी या विमानतळाला अद्यापही भूमिगत वीज वाहिन्यांद्वारे वीजपुरवठा झालेला नाही. त्याचबरोबर पाणी पुरवठाही झालेला नाही. अशी अनेक कामे प्रलंबित असल्याने हे विमानतळाची कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सुरु होऊ शकत नाही, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते संकेत
जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळात मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी ते चिपी विमानतळावर हेलिकॉप्टरने उतरले होते. यावेळी त्यांनी चिपी विमानतळाच्या धावपट्टीचीही पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, की आतापर्यंत या विमानतळाच्या उद्धघाटनाच्या अनेक तारखा दिल्या गेल्यात. आता मी तारीख देणार नाही. त्यानंतर डीजीसीआयची परवानगी आली कि विमानतळ सुरु करणार. थोडीसी गंम्मत म्हणून मी त्यांना म्हणालो, की मी असे समजू का कि गणपतीमध्ये मला एसटी नाही तर विमाने सोडावी लागतील. म्हणजे थोडक्यात लवकरात लवकर आपण हा एअरपोर्ट सुरु करू शकू का ? तर त्यांचे म्हणणे आहे, कि डीजीसीआयचा रिपोर्ट आला कि आपण करू शकू. त्यामुळे तो रिपोर्ट येउ द्या, मग तारीख ठरवून विमानतळ सुरू करू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.
'मुख्यमंत्र्यांना व्हीटी स्टेशनच्या बाहेर बसायला सांगा'
खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका केली. ते म्हणाले, की एक रस्ता, भूमिगत वीजवाहिनी आणि पाण्याची लाइन तीन गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. खासदार तुमचा कितीवेळा तारखा देतो, त्याला काहीतरी माहिती आहे. मी संबंधित मंत्र्यांशी बोललोय. मला म्हणाले साहेब या तीन गोष्टी सरकारकडून पूर्ण करून घ्या, मी दुसऱ्या दिवशी परवानगी देतो. परवानगीसाठी त्यांनी याच अटी घातल्या आहेत, असे सांगतानाच राज्य शासनाकडे पैसे नाहीत व्हीटी स्टेशनच्या बाहेर बसायला सांगा मुख्यमंत्र्याला जमा होतील, अशी टीकाही यावेळी नारायण राणे यांनी केली.
'चतुर्थीपर्यंत विमानतळ होईल सुरू'
या विमानतळाच्या उद्धघाटनाच्या अनेक तारखा देणारे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गत आठवड्यात सांगितले, की या विमानतळाच्या रनवेच काम पूर्ण झाल्यानंतर फ्रिक्शन टेस्ट झालेली आहे. एटीआर येत्या दोन दिवसात डीजीसीआयकडे दाखल होईल. एटीआर दाखल झाल्यानंतर डीजीसीआयची टीम येऊन लायसन्स मिळाल्यानंतर विमानाच्या प्रवासाची तारीख जाहीर केली जाईल, असे राऊत यांनी सांगितले. तर चतुर्थीला विमानतळ सुरु होईल का ? असे विचारले असता ते म्हणाले, डेफिनेटली विमानतळ सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले.