सिंधुदुर्ग : विमानतळाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. राणेंना जनआशीर्वाद यात्रेत अटक झाल्यानंतर आज ठाकरे आणि राणे एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. आजच्या कार्यक्रमात नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या फटकेबाजीचा खरपूस समाचार घेतला.
नाहीतर कोणीतरी म्हणेल मालवण किल्ला मीच बांधला
मुख्यमंत्री म्हणाले कि, आजचा क्षण हा आनंदाचा आहे, आदळआपट करण्याचा नाही. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण यांचं नातं अतूट आहे. आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आज आपण कोकणचं महाराष्ट्राचं वैभव, संपन्नता जगासमोर नेत आहोत. हे विमानतळ कोकणच्या विकासासाठी खुप महत्वाचे ठरणार आहे, असे म्हणत या जिल्ह्याला ज्या ऐतिहासिक किल्ल्याचं नाव दिलं गेलंय, तो सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. नाहीतर कोणीतरी म्हणेल की मीच बांधला, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाव न घेता लगावला आहे.
अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीची असतात
ज्योतिरादित्यजी मी तुमचं खास अभिनंदन करतोय. कारण तुम्ही इतकं लांब राहून देखील मराठी मातीचा संस्कार विसरला नाही. माती एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीच जाणते. अनेक झाडं उगवतात त्यात काही बाभळीची असतात, काही आंब्याचे असतात आता बाभळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू ? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठ्या सौभाग्याचा दिवस आहे. कारण, शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. अनेकदा मी म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते या सिंधुदुर्गात कोकणवासियांसमोर नतमस्तक झालं ते शिवसेनाप्रमुख.
तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं
तसेच पर्यटन म्हटल्यावर आपल्या समोर साहाजिकच राज्य येतं ते आपल्या शेजारचं राज्य गोवा. आपण गोव्याच्या विरोधातील नाही आहोत. पण आपली जी काय संपन्नता आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे. ते ही काही कमी नाही. काकणभर सरस आहे. कमी तर अजिबातच नाही. मग सुविधा काय आहे तिकडे. एवढे वर्ष विमानतळाला का लागले? एवढी खऱडीघाशी भांडी घाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यावर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन, पर्यंटन, पर्यटन आजपर्यंत अनेकजण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिमान वाटले असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. उर्वरीत गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेन. असेही ते म्हणाले.
बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्या माणसांना शिवसेनेतून हाकलले
या व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रमुख सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत म्हणून अलायन्स एअरलाईन्स आहे काय मला काळात नाही. सर्वांचं अलायन्स केलं. आणि हे सर्व चांगलं चालू असताना त्याला नजर लागू नये म्हणून एक कला टिटा आणावा लागतो. ते लावणारे काही लोक आहेत. नारायणराव आपण म्हणालात ते खर आहे, बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्यात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे. पण ती भयभीत होणारी नाही. म्हणूनच गेली अनेक वर्ष आपल्या हक्काचा माणूस त्यांनी निवडून दिलेला आहे. त्यामुळेच विनायक राऊत आज खासदार म्हणून उभे आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. आणि हेही खर आहे कि, बाळासाहेबांना खोटं बोललेलं आवडत नव्हतं. अजिबात नाही आणि बाळासाहेबांनी असं खोटं बोलणारी जी काही लोक होती त्यांना शिवसेनेतून काढून टाकलं होत हा देखील इतिहास आहे. त्यांनी ते दाखवून दिलाय त्या इतिहासात मला जायचा नाहीय असाही ते म्हणाले. आपण केंद्रामध्ये आज मंत्री आहेत. लघु का असेना, शुशाम का असेना मोठा खात तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्या हि मला तुमच्याकडून अपेक्षा आहे. विकासामध्ये मी कुठेही पक्षभेद आणत नाही. आणि ती इतरांनाही आणू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - चिपी विमानतळाचे उद्घाटन; नाव न घेता मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक