सिंधुदुर्ग - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची चारचाकी अज्ञाताने जाळली गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून, तपास सुरू आहे.
संजू परब यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी खासकीलवाडा परिसर रोड येथील साई दीपदर्शन इमारतीच्या समोर उभी केली होती. बारा वाजण्याच्या सुमारास ते घरी गेल्यानंतर गाडी जळत असल्याचा आवाज आला. त्यांनी बाहेर येवून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी तत्काळ गाडीच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी दारूचे साहित्य तसेच कॅनचे बुच आढळून आले आहेत. त्यामुळे गाडीवर कोणता तरी ज्वलनशील पदार्थ ओतून हा प्रकार केला असावा असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सावंतवाडी नगर पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, गाडी आगीत पूर्णतः जळून खाक झाली आहे. हा प्रकार नेमका कोणी केला, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. आगीची माहिती दिल्यानंतर तब्बल अर्धा तास पोलीस घटनास्थळी आले नाहीत, अशी नाराजी परब यांनी या घटनेनंतर व्यक्त केली.
सदर घटनेची माहिती मिळताच नगरसेक सुधीर आडिवरेकर, विनायक ठाकूर, मनोज नाटेकर, प्रवीण परब, प्रदीप गावडे, संदीप राणे, लवू नाईक, समीर पालव, अमित पोकळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच प्रमाणे घटनास्थळी हवालदार मंगेश शिंगाडे, किरण कांबळी, अर्जुन गवस, संजय हुंबे, सागर ओटवणेकर आदीसह पोलीस उपनिरीक्षक स्वाती यादव देखील दाखल झाले.