रत्नागिरी - कोकण भूमिकन्या महामंडळाने रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधासाठीचा नियोजित मोर्चा रद्द केला आहे. रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करण्यासाठी कोकण विकास समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोकण भूमिकन्या महामंडळाने देखील दंड थोपटले होते. मात्र रिफायनरी समर्थकांचा मोर्चा निघणार असल्याने त्याच दिवशी मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी भूमिकन्या महामंडळाला परवानगी नाकारली.
रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाथ कोकण विकास समितीतर्फे आज मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या नियोजित मोर्चाला प्रतिमोर्चा काढून समर्थकांना उत्तर द्यायचे, असे भूमिकन्या महामंडळाने निश्चित केले होते. याबाबत मोर्चाच्या परवानगीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांशी देखील चर्चाही केली होती. मात्र, त्यांनी ती परवानगी नाकारली.
दरम्यान, भूमिकन्या महामंडळाच्या एका गटाने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी पालकमंत्री वायकर यांनी संघटनेला सांगितले की, कोकणातून रिफायनरी हा विषय संपलेला आहे. या विषयाला कोणी कितीही हवा दिली तरी तो जिवंत होणार नाही. तुम्ही आपली ताकद का वाया घालवत आहात? असा प्रश्नही केला. त्यामुळे भूमिकन्या महामंडळाने मोर्चा रद्द केला, अशी माहिती भूमिकन्या महामंडळाच्या अध्यक्षा शेवंती मोंडे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.