सिंधुदुर्ग - कणकवली शहरातील एस. एम. हायस्कुल आणि गांगो मंदिरनजीक बांधण्यात आलेल्या बॉक्सवेलचे बांधकाम कोसळण्याच्या स्थितीत आहे. एका फुटापेक्षा जास्त हे बांधकाम मुख्य पिलर सोडून बाहेर आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तसेच हे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या कामाच्या दर्जावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या बाजूने होणारी वाहतून तातडीने बंद करून एकाच बाजूने वाहतूक वळवली आहे. पहिल्याच पावसात बॉक्सवेलची झालेली दुरावस्था पाहून दिलीप बिल्डकाँन कंपनीच्या महामार्ग कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कणकवली शहरात दिलीप बिल्डकाँन गेली चारवर्ष महामार्गाचे काम करत आहे. दर्जाहीन काम आणि कामात दिरंगाई यामुळे जनतेमध्ये उग्र संताप व्यक्त केला होता. कणकवली प्रांताधिकारी यांना जाब विचारत कणकवलीकर नागरिकांनी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आज निकृष्ट कामाची पुन्हा प्रचिती आली. गांगोमंदीर आणि एस.एम.हायस्कूल ही नेहमीच रहदारीची ठिकाणे आहेत. त्या ठिकाणीच भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शहरात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, कणकवलीरांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन या कामाची तक्रार नोंदविली आहे.