सिंधुदुर्ग - गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत कोविडच्या पार्श्वभूमीवर राजकारण करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऑक्सिजन दिला म्हणून ते राजकरण करत आहेत. त्यामुळे जिल्हा भाजपाच्या वतीने निषेध नोंदवित आहोत, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले आहे. दरम्यान आज (सोमवार) जिल्हाभर भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी त्यांचा निषेध केला असल्याचेही तेली यांनी सांगितले आहे.
'गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे'
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतात. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत. किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे, असे राजन तेली यांनी सांगितले आहे.
'सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता'
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने नारायणराव राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली. खरेतर गोव्यातही मुबलक सिलिंडर आहेत असा भाग नाही, परंतु डॉ. प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने, तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेसकडून राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जाहीर निषेध करीत आहे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले आहे.