सिंधुदुर्ग - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. भाजपा आमदार नीतेश राणे यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सचिन वाझे हा कुणाचा माणूस होता, हे आता उभ्या महाराष्ट्राला समजले आहे. या प्रकरणात सरळ-सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव येत असेल तर केवळ अनिल देशमुख यांना तुम्ही कसे काय जबाबदार धरता? असा प्रश्न त्यांनी केला आहे.
'वाझे हा कुणाचा माणूस?'
ते पुढे म्हणाले, की मुळामध्ये जे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना दिलेले आहे, त्या पत्राचा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास कराल तर त्याच्यामध्ये आश्चर्य करण्यासारख्या काही गोष्टी आहेत. सचिन वाझे हा कुणाचा माणूस होता, तो कोणासाठी काम करत होता, हे आता उभा महाराष्ट्र जाणून आहे. मागच्या अधिवेशनामध्ये कोण त्यांची वकिली करत होते, मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सचिन वाझेंना घेण्यासाठी कोण दबाव टाकत होते, सरळ सरळ या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव येत असेल तर, अनिल देशमुख यांना तुम्ही कसे काय जबाबदार धरू शकता, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
'हप्त्यासाठी तुम्ही पब, बार, डिस्को सुरू केलात'
त्या पत्रामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग म्हणतात, की माझ्याकडे असलेल्या माहितीबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना अवगत केले होते. तरीही त्यांनी काही केले नाही. म्हणजे याचा अर्थ हाच होतो का, तुम्हाला मंदिरे उघडायची नव्हती. परंतु तुम्हाला पब, बार, डिस्को उघडायचे होते. कारण तुम्हाला हप्ते गोळा करायचे होते. हे आज सिद्ध झाले आहे. कारण मंदिरांमधून हप्ते मिळणार नाही. ते पब, बार, डिस्कोमधून मिळणार हे तुम्हाला माहीत होते, म्हणून तुम्ही हे सर्व चालू करण्याची घाई केली, हे आता स्पष्ट झाले आहे, असेही ते म्हणाले.
'पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचीही चौकशी झाली पाहिजे'
या सर्व प्रकरणात मुंबईत कार्यरत असलेल्या नाइटलाइफ यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न करतानाच ते म्हणाले, 25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर घटना घडते आणि 26 फेब्रुवारीला राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या कार्यालयात का भेटतात, तासभर चर्चा का करतात, असे प्रश्नही त्यांनी या वेळी विचारले. तसेच ही भेट का झाली याचीही चौकशी झाली पाहिजे. तर माजी पोलीस आयुक्तांच्या पत्रातील आरोपांचीदेखील चौकशी झाली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.