सिंधुदुर्ग - राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यामुळे सरकरावर जोरदार टीका होत आहे. माजी मुख्यमंत्र्यांची तसेच कोकणाचे नेतृत्व करणारे नारायण राणे यांना दिलेली सुरक्षा व्यवस्थाही काढून घेण्यात आली आहे. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली आहे. नारायण राणेंची सुरक्षा काढली मात्र, शिवसेना आमदार वैभव नाईक यांना सुरक्षा दिला जात आहे. त्यांना सुरक्षा देण्यासारखे काय घडले? असा सवालही शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. ते सिंधुदुर्गमधील सावंतवाडी येथे बोलत होते.
राज्य सरकारची दुतोंडी भूमिका -
राज्य सरकार दुतोंडी भूमिका घेत आहे. शिवसेनेने आगीशी खेळू नये. आगीशी खेळल्यावर काय होते हे माहीत नसेल तर, त्याची अनूभूती घ्यावी, अशी घनाघाती टीका आशिष शेलार यांनी नारायण राणे यांची सुरक्षा कमी केल्याच्या मुद्यावरून शिवसेनेवर केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंचे सुरक्षेचे वर्गीकरण रद्द केले गेले. त्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र, आमदार वैभव नाईक यांना सुरक्षेचे वर्गीकरण आहे. एकाच जिह्यामध्ये असलेल्या दोन नेत्यांदरम्यान भेदभाव केल्याचे याअगोदर कधीही घडले नाही, असेही शेलार म्हणाले.
असे काय घडले की, वैभव नाईकांना सुरक्षा द्यावी लागली ?
'असे काय घडले की, वैभव नाईकांना सुरक्षा वर्गीकरण द्यावे लागले?' असा प्रश्न शेलारांनी उपस्थित केला. आशिष शेलार सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आपला दौरा हा प्रचारासाठी नसून ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत भाजपा स्थानिक पातळीवर सक्रीय आहे, असेही ते म्हणाले.