पणजी - गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर त्यांच्या निधनानंतर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आपला इतिहास तपासून पाहावा. पर्रीकरांच्या विरोधात आरोप करून आपले पाप झाकण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न निंदनीय व निषेधार्ह आहे, अशा शब्दात भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपचे काँग्रेसला प्रत्युत्तर
गोव्यातील खाण घोटळ्यांवरून गुरुवारी काँग्रेसने भाजपला आव्हान दिले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळातच गोव्यात अमर्याद खाण उत्खनन व वाहतूक झाली. याची चौकशी करण्यासाठी न्या. शाह आयोगाची नियुक्तीही तत्कालीन डॉ.मनमोहन सिंग सरकारने केली. सदर आयोगाचा अहवाल त्याच काँग्रेस सरकारने स्वीकारला व संसदेसमोर ठेवला. पर्यावरण परवाने देखील त्याच सरकारातील तत्कालीन पर्यावरण मंत्री श्रीमती जयंती नटराजन यांनीच निलंबित केले होते. उलट या परिस्थितीतून मार्ग काढत, खाण अवलंबित जनतेला आर्थिक मदतीचा आधार पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर व आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने दिला आहे. सर्वोच्च न्यायलयाचा आदेश व घालून दिलेल्या निर्देशानुसार भाजप सरकारच्या काळात खाण उत्खनन सुरू आहे.
कॉंग्रेसच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही
खाणसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी भाजपने प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. खाण प्रश्न सोडवण्यासाठी आताचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारी व न्यायालयीन पातळीवर जोरदार प्रयत्न चालवले आहेत. निवडणुका जवळ आल्या की आरोप करणे आलेच, पण त्याहीपेक्षा ते धादांत खोटे व वस्तुस्थितीच्या विपरीत आहेत, असे आरोप केवळ काँग्रेसच करू शकते. आज गोव्यातील काँग्रेस पक्ष व त्यांचे नेतृत्व सैरभैर झाले असल्याची ही लक्षणे आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेच्या व गोव्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समर्पितपणे काम करीत असून, काँग्रेसच्या भूलथापांना गोव्यातील जनता बळी पडणार नाही, असेही सावईकर यांनी यावेळी म्हटले आहे.