सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या कणकवलीमधील सुमन दाभोळकर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने दगडावर चित्र साकारून शिवरायांना मानवंदना दिली आहे. कणकवलीतील चित्रकार सुमन दाभोळकर यांच्याकडून ही आगळी वेगळी मानवंदना शिवजयंती निमित्ताने शिवरायांना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दगडावर सुमन दाभोळकर यांनी साकारली आहे. गदनदीमधील दगड वेचून त्या दगडावर सुमन दाभोळकर यांनी चित्र रेखाटून ही आगळी-वेगळी मानवंदना दिली आहे.
टाळेबंदी झाल्यामुळे मुंबईतून गावी आलेल्या सुमन दाभोळकरने दगडांच्या मूळ आकारात कोणतेही बदल न करता त्यावर रंगांची उधळण करुन व्यक्तीचित्रे, निसर्गचित्रे साकारत दगडांना जिवंत करण्याची किमया साधली आहे. दगडांना जिवंत करणारा कलाकार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. सुमन दाभोळकर हे मूळचे सिंधुदुर्गातील कणकवलीमधले आहेत. आपल्या हातातील कलेने त्यांनी दगडांना मूर्त रुप दिले. मुंबईत राहणारे सुमन कोरोनामुळे टाळेबंदी झाल्यानंतर ते कणकवलीमध्ये आपल्या गावी आले. गावी आल्यानंतर त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या आजूबाजूला, गावांतील नदीकाठच्या दगडांना बोलत केले.
हेही वाचा-चक्क ट्रॅक्टर स्वार होऊन नवरी पोहचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा
फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतलेले सुमन हे मूळचे कणकवलीचे
गेल्या दोन वर्षापासून सुमन दाभोळकर हे ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहतात. दगडांवर कलाकृती साकारण्याची कल्पना कशी सुचली, यावर ते म्हणाले की, टाळेबंदीमुळे मी बऱ्याच वर्षांनी गावी निवांत राहिलो. आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच नदी आहे. नदीवर गेलो असता खडक माझ्यातील कलाकाराला खुणावू लागले. त्या विशाल खडकांतून मला निरनिराळे आकार दिसले. मग ते आकार प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्यातील कलेची मदत झाली. सुरुवातीला गंमत म्हणून मी दगडांवर काही पोट्रेट तयार केले. त्यात मला आनंद मिळत गेला. त्यातून निरनिराळ्या कलाकृती घडत गेल्या. सुमन यांनी दगडावर आतापर्यंत आईनस्टाईन, सचिन तेंडुलकर, नसिरुद्दीन शहा, महेंद्रसिंह धोनी, सोनू सूद आदींचे पोट्रेट साकारले आहेत. त्याचबरोबर मासा, मांजर, कुत्रा, कासव व वडापाव या कलाकृतीही साकारल्या आहेत.
हेही वाचा-मद्रास उच्च न्यायालयाची 'सीरम' आणि आयसीएमआरला नोटीस
शिवरायांना दिली आगळीवेगळी मानवंदना
सुमन दाभोळकर यांनी साकारलेल्या दगडांवरील कलाकृतींना मागणीसुद्धा आहे. त्यांच्या अनेक कलाकृती विकल्या गेल्या आहेत. नदीकाठी मिळणाऱ्या दगडांना रंगवून वैशिष्ट्यपूर्ण अशी विविध प्रकारचे कलाकृती बनवताना सुमन यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करायला आवडते. अशा या अवलिया कलाकाराने दगडावर शिवाजी महाराजांचे चित्र साकारून आज महाराजांच्या जयंती दिनी त्यांना आगळीवेगळी मानवंदना दिली आहे.