सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आता लॉक डाऊन असताना रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट केली जात आहे. जिल्ह्यातील महामार्गावर ठीक ठिकाणी आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. कणकवली शहरात या पथकाकडून आज दिवसभरात तपासणी करण्यात आलेल्यांपैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांची केली जाते तपासणी
जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान लॉकडाउन असतानाही जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यांची कमी नाही. अशा लोकांच्या माध्यमातून कोरोणाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आता थेट महामार्गावरच आरोग्य विभागाची पथके तनात करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून अँटीजन रॅपिड टेस्ट केली जात आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्या लोकांचे चांगले धाबे दणाणले आहेत.
कणकवलीत फिरणाऱ्यांमध्ये आढळले 2 पॉझिटिव्ह
यावेळी बोलताना समूह आरोग्य अधिकारी डॉक्टर सुविधा सावंत यांनी माहिती देताना सांगितले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची आम्ही आरोग्य तपासणी करत आहोत. त्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे. आतापर्यंत कणकवली शहरात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये तब्बल दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
लोकांनी घराबाहेर पडू नये
कणकवली शहरामध्ये तैनात करण्यात आलेल्या पथकातील महसूल विभागाचे प्रतिनिधी अरविंद गवळी म्हणाले, लोकांनी घराबाहेर पडू नये. त्यांनी काळजी घेतली पाहिजे. समूह संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. मात्र या ठिकाणी लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा फिरणाऱ्या लोकांच्या माध्यमातून संसर्ग रोखण्यासाठी महसूल विभाग आरोग्य विभाग आणि कणकवली नगरपंचायत यांच्या माध्यमातून याठिकाणी पथक तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत दोघेजण पॉझिटिव्ह सापडले आहेत. ही तपासणी अशीच चालू राहणार आहे असेही ते म्हणाले.
या तपासणीमुळे अनेकांची उडाली धांदल
दरम्यान जिल्ह्यात कोवीडचा वाढता प्रभाव आणि संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने प्रशासन विविध पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक शहरामध्ये आणि महामार्गावर प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या लोकांची तपासणी सुरू केली आहे. यामुळे अनेकांची धांदल उडाली आहे. या पथकापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शहरात येणे लोकांनी टाळले आहे. किंबहुना यातूनच जिल्हा पुन्हा कोरोनामुक्ती कडे जाणार आहे हे निश्चित.
परदेशी लोकांना लस द्यायची आन् आपल्या देशातील लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदाहेही वाचा -