सिंधुदुर्ग - कोरोनामुळे सारे जग प्रभावित झाले आहे. भारत देश सध्या लॉकडाऊन मध्ये आहे. मात्र हे महासंकट थांबण्याच नाव घेत नसताना काही लोक मात्र शासन व आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसत नाहीत. आशा लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या गवाने गावातील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी आपल्या चित्रातून वेगवेगळे संदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्याने लोकसेवकाना बोलते केले आहे.
अक्षयची चित्रे लोकांसाठी काम करणाऱ्या आणि कोरोनाच्या युद्धात प्रत्यक्षात लढणाऱ्या पोलीस,सफाई कामगार,आरोग्य कर्मचारी, बातमीदार यांना बोलते करताहेत. अक्षयच्या चित्रातील साफसफाई करणारे कर्मचारी सांगतात तुम्ही कचरा टाकू नका आम्ही स्वच्छता करतोय...पोलिस सांगत आहेत घरीच थांबा आम्ही तुमच्यासाठी काम करतोय आमच्या घरीसुध्दा माणसं आहेत...बातमीदारही कोरोना बाबतच अपडेट देताहेत आणि सांगताहेत की तुम्ही बाहेर पडू नका, हा व्हायरस धोकादायक आहे.
आरोग्य खात्यातील लोक स्वतः जीव धोक्यात घालून पेशन्टला ठीक करत आहेत. ते सर्वाना सांगत आहेत तुम्ही स्वतः खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. शेतकरी जेव्हा शेतात काम करतात तेव्हा सर्वांच्या घरची चूल पेटेल, मात्र अक्षयच्या चित्रातील हेच शेतकरी प्रार्थना करत आहेत की कोरोना व्हायरस नष्ट होऊ दे. चित्रातून संवाद साधणारा अक्षय मेस्त्री आपल्या या उपक्रमाबाबत बोलताना म्हणाला की, सर्वानी योग्य ती दक्षता घेतली तर हे संकट टळेल. एका बाजूला आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकजण सेवा देत आहेत, मात्र आपण आपला जीव धोक्यात घालून प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या लोकांना आणखीन अडचणीत आणत आहोत. तरी सर्वानी घरात थांबुयात आणि कोरोनाला पराभूत करुयात, असंही त्याने सांगितलं.