सिंधुदुर्ग - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पूर बाधित लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांची विचारपूस केली. तसेच शिवसेना आपल्या सदैव पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यान, बांदा येथील विठ्ठल मंदिरात पूरग्रस्तांशी संवाद साधताना लोकांमध्ये बसून त्यांनी पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्तांना भांडी, डाळ, तांदूळ, चटई, चादर, साखर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीच्या धनादेशाचे वितरण देखील केले. विशेष म्हणजे कोकणातील पुरपरिस्थिती नंतर कोणत्याही पक्षाचा नेता या ठिकाणी फिरकलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला.
आदित्य ठाकरे यांना आंबोलीच्या सौंदर्याची भुरळ !
कोकण दौरा आटपून परत येताना आदित्य ठाकरेंना आंबोलीच्या सौंदर्याने भुरळ घातली. सायंकाळचे रम्य वातावरण, दाट धुकं, उंचावरून कोसळणारा नयनरम्य धबधबा याची भुरळ आदित्य यांनाही पडली. चक्क त्यांनी गाडीतून उतरून धबधबा पाहण्याचा आनंद घेतला. तसेच खचलेल्या आंबोली घाटाची देखील पहाणी केली. दरम्यान, यावेळी आंबोलीतील नागरिकांनी सतत कोसळणाऱ्या दरडींची व्यथा आदित्य यांच्यासमोर मांडली. आदित्य ठाकरे यांनी देखील लवकरात लवकर घाट दुरुस्त होईल याची ग्वाही दिली.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सचिन अहिर, जिल्हाप्रमुख संजय पडते आदींसह शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.