सिंधुदुर्ग - जिल्ह्याची वैभवशाली व गौरवशाली परंपरा वृद्धींगत करण्याचा आज संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहण समारोह कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 कोटी रुपयांचा तातडीचा निधी जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्यात आली असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आणखी शासकीय मदत मिळणार आहे. जिल्ह्याची स्वतःची आपत्ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याला एक बोट, त्याची वाहतूक करण्यासाठी एक वाहन आणि प्रशिक्षीत टीम देण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
कलम 370 रद्द करून काश्मीरी जनतेला रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून दिल्या. तसेच एक राष्ट्र-एक घटना या दिशेने पाऊल उचलल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करत असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांना चालना दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या चांदा ते बांदा या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी. तसेच जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड यासारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे उपस्थित होते.