रत्नागिरी- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अंतिमत: ६१.६९ टक्के मतदान झाले, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ६६.३२ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवूनसुध्दा मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे.
लोकसभेच्या १७ व्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये ६१.६९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. या लोकसभा मतदारसंघातील सावंतवाडी आणि कुडाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये तुलनेने सर्वाधिक मतदान झाले. सावंतवाडीमध्ये २ लाख २३ हजार ५२६ इतके मतदार असून. ६५.५० टक्के म्हणजे १ लाख ४६ हजार ४०१ मतदान झाले. तर कुडाळमध्ये २ लाख १३ हजार ६६८ मतदार असून, पैकी १ लाख ३७ हजार १२० म्हणजे ६४.१७ टक्के मतदान झाले. यापाठोपाठ कणकवली येथे २ लाख २९ हजार ५२६ मतदार असून, १ लाख ४५ हजार ९६१ इतके म्हणजे ६३.५९ टक्के मतदान झाले आहे.
रत्नागिरी येथे २ लाख ८० हजार ८१९ मतदार असून, १ लाख ७६ हजार ८०४ इतके म्हणजे ६२.९६ टक्के मतदान झाले आहे. राजापूर येथे २ लाख ३७ हजार ८४५ इतके मतदार असून, १ लाख ३८ हजार १६६ इतके म्हणजे ५८.०९ टक्के मतदान झाले. चिपळूण येथे २ लाख ६९ हजार १४१ मतदार असून, १ लाख ५२ हजार ७९४ म्हणजे ५६.७७ इतके मतदान झाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ७ लाख १२ हजार ०१४ पुरुष मतदार आहेत. त्यापैकी ४ लाख ४७ हजार ६३३ जणांनी मतदान केले (६२.८७%) तर ७ लाख ४२ हजार ४९९ महिला मतदारांपैकी ४ लाख ४९ हजार ६१३ म्हणजे (६०.५५) टक्के महिलांनी मतदान केले.
यावेळी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून, प्रचंड प्रयत्न केले होते. तरीदेखील या प्रयत्नांना फारसे यश मिळाल्याचे दिसून येत नाही. सन २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण ६६.३२ टक्के एवढे मतदान झाले होते. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात ५६.७७ टक्के, रत्नागिरीत ६२.९६ टक्के, राजापूर ५८.०९ टक्के, कणकवली ६३.५९ टक्के, कुडाळ ६४.१७ टक्के तर सावंतवाडी विधानसभा मतदरसंघात ६५.५० टक्के मतदान झाले होते.