सिंधुदुर्ग - जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील कातकरी आदिवासी समाजातील महिला व पुरुषांना मारहाण केल्याप्रकरणी वनरक्षक, वनपाल यांच्यासह ५ वन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. कणकवली पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आदिवासी महिलेला केली होती दांड्याने मारहाण
आदिवासी कातकरी समजतील सखू पवार व अन्य पुरुष फोंडाघाट वनक्षेत्रातील वनविभागाच्या जंगलात औषधे गोळा करण्यासाठी गेले असताना वनपाल आणि वनरक्षकांनी तिला शिविगाळ करत दांडक्याने मारहाण केली. या गुन्ह्यात वनपाल शशिकांत साटम, तसेच वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल ( सर्व रा.फोंडाघाट , ता.कणकवली ) यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याला फुटली वाचा
सत्यशोधक सेक्युलर फ्रंटचे ऍड.सुदीप कांबळे यांनी या गुन्ह्याला वाचा फोडली. आदिवासी कातकरी बांधवाना अमानुष मारहाण करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात दाद मागण्यासाठी पीडित कातकरी बांधवांसोबत कणकवली पोलीस ठाणे गाठून कातकरी बांधवांची बाजू लावून धरली होती. अखंड लोकमंच चे नामानंद मोडक यांनीही पोलीस ठाण्यात जात कातकरी बांधवांची बाजू मांडली होती. अखेर या लढ्याला यश आले असून वनरक्षक, वनपाल यांच्यासह ५ वन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैर झाडे तोडताना पकडून गुन्हा दाखल केल्यामुळे मारहाणीचा बनाव
फोंडाघाट येथील वनविभागाच्या जंगलातील खैराची झाडे तोडताना त्या आदिवासी बांधवांना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर वनअधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या खैर वृक्षतोडीचा गुन्हा दाखल केल्यामुळे मारहाणीचा बनाव केला असल्याची माहिती वनपाल साटम यांनी दिली. 18 फेब्रुवारी रोजी फोंडाघाट येथील कातकरी समाजातील 3 पुरुष आणि एक महिला फोंडाघाट येथील वनविभागाच्या जंगलात खैर वृक्षतोड करताना आढळून आले होते. यावेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले असता 3 पुरुष घटनास्थळावरून पळून गेले तर महिला सापडून अली होती. त्या महिलेमार्फत अन्य साथीदारांची माहिती घेऊन त्यांच्यावर 19 फेब्रुवारी रोजी वनअधिनियम 1927 चे कलम 26 ( फ ) ( ड ) नुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्या महिला अथवा पुरुष कातकरी आदिवासींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केलेली नसल्याचेही वनपाल साटम यांनी सांगितले.