सिंधुदुर्ग - कणकवली तालुक्यातील नरडवे धरण प्रकल्पात 40 कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा गौप्यस्फोट मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून यात केंद्र सरकारच्या निधीचा अपहार झाल्याने आपण सीबीआयच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाच्या काळात अखर्चित निधी सरकार मागे घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी खर्च घालण्याचे काम करण्यात आले आहे. नरडवे धरण प्रकल्पात प्रत्यक्षात 25 हजार क्यूबिक मीटर काम झाले असताना 40 हजार क्यूबिक मीटर काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मुळात डीआरएम इन्फ्रास्ट्रक्चर हुबळी यांचे हे काम चक्रधरण कन्स्ट्रक्शन जळगाव यांना हस्तांतरित करण्यात आले आहे. 1999 सालात 38 कोटींचे धरण आता 1 हजार 84 कोटींवर गेले आहे. त्यात कोणतेही कालवे नाहीत. या धरण कामात केंद्र सरकारचा निधी असून या रक्कमेचा अपहार झाल्याचे समोर आले आहे, असेही उपरकर म्हणाले.