सातारा - मादीपासून वेगळा झालेला एक महिन्याचा बिबट्याचा बछडा सुपने (ता. कराड) येथील शेतकऱ्यांना सोमवारी (दि. ६) दुपारी उसाच्या शेतात आढळला होता. परंतु, काही तासांतच मादी आपल्या बछड्याला तेथून घेऊन गेली आणि वन विभागाने सुटकेचा निश्वास सोडला.
मादीपासून दुरावलेला बिबट्याचा बछडा सुपने येथील माळी मळा नावाच्या शिवारात उसाच्या शेतामध्ये सोमवारी दुपारी शेतकऱ्यांना आढळला. ही माहिती शेतकऱ्यांनी वन विभागाला कळवली. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी बछड्याभोवती उसाच्या कांड्या रोवून कुंपण केले. आपल्या बछड्याला घेण्यास मादी येते का, याची सगळे प्रतिक्षा करत होते. मादी आल्यानंतर बछड्याला घेऊन जातानाचे चित्रीकरण करण्यासाठी बछड्यापासून दूरवर कॅमेरा ट्रॅपही लावण्यात आला होता. कॅमेऱ्याचे सेटींग सुरू असतानाच बछड्याची मादी आली बछड्याला घेऊन गेली.
मादी-बिबट्याच्या भेटीमुळे वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी विलास काळे, वन रक्षक अशोक मलप, रमेश जाधव, दादाराव बर्गे, योगेश पाटील, अमोल महाडिक योगेश बडेकर यांनी मादी आणि बछड्याची भेट घडवून आणण्यासाठी दिवसभर शेतात तळ ठोकला होता.