कराड (सातारा) - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकरांचे सुपूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी कराड दक्षिणची पहिली विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यात ते पराभूत झाले. मात्र, निकालाच्या दुसर्याच दिवशी त्यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या. आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विलासकाका उंडाळकरांनी बुधवारी (दि.30) आभार मेळावा घेतला आहे. त्या मेळाव्यात ते काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - सातारा जिल्ह्यात पाटणच्या सुपुत्रांचा बोलबाला!
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 2014 पर्यंत कराड दक्षिणमध्ये केवळ दोनच आमदार झाले. 1980 पर्यंत दिवंगत यशवंतराव मोहिते आणि 1980 ते 2014 पर्यंत विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केले. असा राजकीय इतिहास असणारा कराड दक्षिण हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे. यशंतराव मोहिते हे पूर्वी शेकापमध्ये होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. विलासकाका उंडाळकर हे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी. त्यांनी आजअखेर यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारापासून आणि काँग्रेस विचारांपासून कधीही फारकत घेतलेली नाही. 2009 साली मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यात कराड शहर, मलकापूरसारखे शहर कराड दक्षिणेत आले. तरीही उंडाळकरांनी बाजी मारली. मात्र, वर्षभरातच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात पाठविले. चव्हाण आणि उंडाळकर हे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. अशातच 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढली गेली. त्यामुळे कराड दक्षिणची उमेदवारी उंडाळकरांऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांना मिळाली. सलग सातवेळा आमदार झालेल्या उंडाळकरांनी चव्हाण यांच्या विरोधात बंडखोरी केली. तसेच भाजपने डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे तिरंगी लढत होऊन चव्हाण विजयी झाले. उंडाळकर दुसर्या आणि भोसले तिसर्या क्रमांकावर राहिले होते.
हेही वाचा - राष्ट्रवादी पक्षाला व साताऱ्याच्या जनतेला विजय अर्पण - खासदार श्रीनिवास पाटील
त्यानंतच्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सातारा जिल्ह्यातील काँग्रेसमध्येही अनेक घडमोडी झाल्या. कालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तर चव्हाणांची सावली समजले जाणारे आ. आनंदराव पाटीलच भाजपच्या गोटात गेले. तसेच कराड नगरपालिकेतील अनेक नगरसेवकांनीही भाजपमध्ये उड्या मारल्या. अशा परिस्थितीत पृथवीराज चव्हाण यांना पुन्हा एकदा तिरंगी लढतीचा सामना करावा लागला. 2014 चीच परिस्थिती उद्भवली. फरक इतकाच होता की, पृथ्वीराज चव्हाणांविरोधात विलासकाका उंडाळकरांऐवजी त्यांचे सुपूत्र रिंगणात होते. भाजपमधून पुन्हा अतुल भोसले मैदानात उतरले होते. तरीही निकाल पुन्हा 2014 प्रमाणे लागला आणि विजयाचा गुलाल चव्हाणांच्या पारड्यात पडला.
हेही वाचा - उदयनराजेंनी लोकनिर्णयाचा आदरा करावा - रोहित पवार
चव्हाण-उंडाळकर यांच्यात राजकीय सख्य नसले तरी दोघेही काँग्रेस विचारधारेचे नेते आहेत. त्यामुळे भाजपसारख्या जातीयवादी पक्षाने स्व. यशवंतराव चव्हाणांच्या तालुक्यात शिरकाव केला, तर दोघांसाठी ती घटना पराभवापेक्षाही धक्कादायक ठरली असती. तशी वेळ आली नाही. 2014 च्या निवडणुकीत विलासकाकांना 60 हजार मते मिळाली होती. परंतु, त्यांचे सुपूत्र अॅड. उदयसिंह यांना यावेळी फक्त 29 हजार मते मिळाली. यामुळेच उंडाळकर बुधवारच्या आभार मेळाव्यात काय बोलणार, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.