कराड (सातारा) - गेली 35 वर्षे तळहाताच्या फोडाप्रमाणे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ मी जपला होता. मात्र, मागील निवडणुकीत सत्तेच्या जोरावर माजी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघातील आचार-विचार संस्कृती उद्ध्वस्त केली. या कर्तबगार माजी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे फक्त 42 आमदार निवडून आले होते. या दुरवस्थेलाही तेच जबाबदार होते. ते आता संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस संपवायला निघालेत, अशी खरमरीत टीका माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.
हेही वाचा - आम्ही थकलेलो नाही, जोमाने उभे राहिलोय - बाळासाहेब थोरात
कराड दक्षिण मतदारसंघातील रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या प्रचार शुभारंभाच्या सभेत ते बोलत होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणात कधीच सुडाचे राजकारण केले नाही. परंतु, माजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची संस्कृती उद्ध्वस्त करून टाकली. तेच आज आपल्या विरोधात उभे आहेत. दुसर्या उमेदवाराबाबत बोलायलाच नको. आमदार होण्यासाठी त्यांचे काय-काय उद्योग सुरू आहेत, याबद्दल बोलायलाच नको, असा अतुल भोसलेंना टोला मारून विलासकाका म्हणाले, राजकारण आणि समाजकारण करताना मी जे केले ते जनतेसाठी केले. त्यामुळे मला मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. सभेला झालेल्या गर्दीमुळे कार्यकर्त्यांनी हुरळून अथवा भारावून जाऊ नये. निर्भयपणे मताचा अधिकार बजावून यशवंत विचारांना मत देऊन कराड दक्षिणची विस्कटलेली घडी ठीक करण्यासाठी अॅड. उदयसिंहांना विजयी करा.
हेही वाचा - माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे
अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी गेल्या 35 वर्षात कधी दिखावा केला नाही. समाजात मिसळून रचनात्मक विकास केला. तेच काम आपणास पुढे न्यायचे आहे. रयत संघटनेची गेली पन्नास वर्षाची ती परंपरा आहे. नुसत्या घोषणा करून निवडणूक जिंकता येणार नाही. मतदारसंघात 1980 पूर्वी काय अवस्था होती आणि त्यानंतर 2014 पर्यंत विलासकाकांनी केलेला मतदारसंघाचा कायापालट, मागील पाच वर्षात विद्यमान आमदारांनी केलेली कामे याचा तुलनात्मक लेखाजोखा लोकांसमोर कार्यकर्त्यांनी मांडला पाहिजे. कार्यकर्त्यांची संघटना आणि ताकदीचे नियोजन करून कराड दक्षिणची आमदारकी पुन्हा यशवंत विचारांकडे आणण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले.