सातारा - येत्या २१ तारखेला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर पक्षाकडून एकमेंकावर टीका होत आहेत. माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसलेंवर पुन्हा निशाना साधला आहे. एका उमेदवाराने स्व. यशवंतराव चव्हाणांचे विचार आणि संस्कृती, तर दुसर्या उमेदवाराने वाममार्गाने मिळविलेल्या पैशाच्या जोरावर कराड दक्षिण मतदार संघ उध्वस्त केल्याचे ते जाहीर सभेत बोलताना म्हणाले. याचबरोबर त्यांनी रयत संघटनेचा उमेदवारच विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
हेही वाचा - कराड उत्तरमधील परिवर्तनाची लढाई जिंकणारच - धैर्यशील कदम
विरोधातील दोन्ही उमेदवार वेगळ्याच मुद्यांवर लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी केली. विद्यमान आमदारांनी मागच्या निवडणुकीत दिलेली किती आश्वासने पाळली याचा जाब विचारण्याची ही वेळ आहे. संकटकाळात नेहमीच आम्ही बहुजन, वंचित अल्पसंख्यांक व व्यापारी समाजासह सर्वसामान्यांच्या बाजूने राहिलो आहोत. कराड ही स्वातंत्र्य सैनिकांचे केंद्र असून स्व. यशवंतराव चव्हाण यांचे विचार जोपासण्यासाठी आम्ही संघटनेमार्फत उदयसिंह पाटील यांना उमेदवारी दिली. कराडच्या जनतेने त्यांना पाठिंबा देऊन विजयी करावे, असेही उंडाळकर यांनी लोकांना केले. आता मतदार जागा झाला असून उद्याची पहाट रयत संघटनेसाठी निश्चितच गुलाल घेऊन येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विलासकाका उंडाळकर यांनी गेली पन्नास वर्षे सातारा जिल्ह्यात यशवंतरावांचे विचार जोपासले आहेत. जातीयवादी पक्षाच्या त्यांना ऑफर आल्या. पण, ते पुरोगामी विचारांपासून ढळले नाहीत. सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन ते वाटचाल करत आले आहेत. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेऊन उंडाळकरांनी सत्ता स्थापन केली. ओबीसी महिला आरक्षण असल्याने त्यांनी मुस्लिम समाजाच्या फरिदा इनामदार यांना कराड पंचायत समितीच्या पहिल्या मुस्लिम महिला सभापती केले. मतदार संघातील मशिदींना संरक्षक भिंत आणि सभामंडपासाठीही त्यांनी निधी दिला होता. म्हणूनच मुस्लिम बांधव आता रयत संघटनेचे उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत, असे मजहर कागदी यांनी सभेत सांगतिले.
हेही वाचा - 'धैर्यशील कदम हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार'
कराडच्या मंडई चौकात रयत संघटनेचे अपक्ष उमेदवार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या प्रचारार्थ माजी सहकार मंत्री विलास पाटील-उंडाळकर यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मजहर कागदी, कराड पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, माजी नगरसेवक सुभाष घोडके, माजी नगरसेविका सुनंदा जाधव, फारुख बागवान, बाळू मसुरकर, आदम पालकर, नसरुद्दीन बेपारी, गफारभाई बागवान, दिलीप घोडके, प्रकाश जाधव, हमीद बागवान, रघुनाथ आमणे, तानाजी कुंभार उपस्थित होते.