सातारा - कराडनजीकच्या मलकापूर उपनगरातील आगाशिवनगर भागात विकास उर्फ विकी लाखेवर बेछूट गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयितांना तब्बल 40 दिवसांनी अटक करण्यात यश आले आहे. सातारचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी दाखविलेल्या चिकाटीचे कौतुक केले आहे.
हेही वाचा -औरंगाबादेत लाच स्वीकारताना पालिका अभियंतासह नगरसेविकेचा पती एसीबीच्या जाळ्यात
आगाशिवनगरमध्ये पत्त्याचा क्लब चालवणार्या विकी उर्फ विकास लाखेचा 6 नोव्हेंबरच्या रात्री गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देत होते. दोन दिवसांपुर्वी मुख्य संशयित अर्जुन रामचंद्र पोळ (वय 47, रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, कराड) आणि अमित ऊर्फ संदीप तातोबा कदम (वय 30 रा. कदमवस्ती, खानापूर रोड, विटा जि. सांगली) यांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गुन्ह्याच्या तपासासाठी सातारा स्थानिक गुन्हे शाखाही समांतर तपास करत होती. परंतु, कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासात खंड पडू न देता चिकाटी दाखवित मुख्य संशयितांना अटक केली. या कामगिरीबद्दल सातारचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमचे कौतुक केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे आणि त्यांच्या टीमने महिनाभर संशयितांच्या तपासासाठी घेतलेले कष्ट कौतुकास्पद आहेत, असेही ते म्हणाले.
संशयित अर्जुन पोळ याच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली 16 गुन्हे दाखल आहेत. अमित कदम याच्यावरही गुन्हे दाखल असून दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
हेही वाचा - पूर्ववैमनस्यातून खामगाव तालुक्यातील युवा शेतकऱ्याची हत्या