सातारा- परतीच्या पावसामुळे माण-खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच नुकसानीच्या पाहणीकरिता कृषी आणि महसूल विभागाचे तलाठी, सर्कल तसेच मंडल अधिकारी फिरकत देखील नसल्याचे समोर आले आहे.
या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत. अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले या पिकांसह कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. पावसामुळे जीवापाड परिश्रम करून जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभाग यांनी वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
हेही वाचा- दुष्काळी माण तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले; बंधारे गेले वाहून