सातारा : मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी अशा दोन वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु झाल्या. दुसरीकडे कोल्हापूरहून मुंबईकडे सुटणाऱ्या केवळ दोनच रेल्वे उरल्या आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी हे कोल्हापूर दौर्यावेळी सातारा रेल्वे स्टेशनवर आले असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेऊन कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी केली. तसेच कराड तालुक्यातील रेल्वेच्या फ्लायओव्हरचे तात्काळ उद्घाटन करून नागरीकांसाठी खुला न केल्यास आम्हीच शेतर्यांना घेऊन उद्घाटन करू, असा इशाराही उदयनराजेंनी महाव्यवस्थापकांना दिला.
तिसरा थांबा मंजूर करण्यात यावा: यशवंतपूर-चंदीगढ संपर्क क्रांति एक्सप्रेस आणि म्हैसूर-निजामुद्दीन संपर्क क्रांति एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या, उत्तर तसेच दक्षिण भारत जोडणार्या आहेत. सातारा जिल्ह्यातील तिन्ही सेना दल आणि पॅरा मिलिटरी दलातील आमचे बांधव या गाड्यांमधून प्रवास करतात. खास बाब म्हणून पुणे विभागात या दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना सातारा येथे तिसरा थांबा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवानी यांच्याकडे केली.
सह्याद्री एक्सप्रेस गाडी पुन्हा सुरू करावी: सातारा आणि कराड रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशांसाठी वेगळे प्रतीक्षालय उभे करावे, अशी महत्वाची मागणी उदयनराजेंनी केली. तसेच मुंबई-कोल्हापूर दरम्यान धावणारी सह्याद्री एक्सप्रेस गाडी अनेक दिवसांपुर्वी अचानक बंद करण्यात आली आहे. नागरीकांना मुंबईला जाण्यासाठी या गाडीचा उपयोग होत होता. त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेस गाडी पुन्हा सुरू करावी, असे उदयनराजेंनी महाव्यवस्थापकांना सुचित केले.
लांब पल्ल्याच्या गाड्या मिरजपर्यंत न्याव्यात: पुणे रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्यांसाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे तिथून सुटणार्या लांब पल्ल्याच्या गाड्या सातारा अथवा मिरजपर्यंत नेण्यात याव्यात. ज्यामुळे उत्पन्नामध्ये भर पडेल आणि प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पुण्यापर्यंत जावे लागणार नाही, ही बाब उदयनराजेंनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच सातारा रेल्वे स्टेशनवर लांब पल्ल्याच्या गाड्या फक्त 2 मिनिट थांबतात, त्याचा कालावधी वाढवून 3 मिनिट करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कराड, सातार्यात थांबा देण्याची मागणी: बंगळुरू-जोधपुर एक्सप्रेस गाडीला कराड, म्हैसूर-उदयपूर हमसफर एक्सप्रेस, हुबळी-दादर सेंट्रल या गाडीला सातारा इथे थांबा देण्यात यावा, अशी मागणी उदयनराजेंनी केली. यावेळी पुणे विभागीय मॅनेजर श्रीमती इंदू दुबे, सातारा जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण विभागाचे माजी सभापती सुनील काटकर, मध्य रेल्वे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य अॅड. विनीत पाटील उपस्थित होते.
हेही वाचा: |