कराड (सातारा) - कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांना कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या दोघांच्या कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कराडमधील कोरोनाबाधितांची संख्या आता २५ आणि सातारा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५ झाली आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी याबाबतची माहिती दिली.
राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने सातारा जिल्ह्यातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात कराडमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित २५ रुग्ण आढळून आले आहेत. साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ३२, कृष्णा रुग्णालयातील ९, कराड उपजिल्हा रुग्णालयातील ४३ आणि कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील १४, अशा एकूण ९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ४, कृष्णा रूग्णालयात ९ अशा एकूण १३ जणांना अनुमानित म्हणून आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.