सातारा - माण तालुक्यातील राणंद (शिवाजी नगर)मध्ये वीजेच्या शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली. या आगीत दोन घरे जळून खाक झाली. शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. गावातील नागरिकांनी आणि अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, घरात गॅस सिलेंडर असल्याने काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले होते.
शनिवारी रात्री भरत विजय कुलकर्णी, कुमार लिंबाजी कोरे यांच्या घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील रहिवाशांनी बाहेर धाव घेतली. आग लागल्याचे समजताच गावातील कृष्णा शिंदे, संग्राम शिंदे, रोहित शिंदे, आकाश शिंदे, गणेश शिंदे, चैतन्य भोंडवे, सुहास सावंत यांनी पाण्याचा टँकर बोलवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्या ठिकाणी गॅस सिलिंडर असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळा नंतर गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात आले.
गावकरी व अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत दोन खोल्या जाळून खाक झाल्या असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.