सातारा - कोरोना झालेल्या 2 रुग्णांचा मृत्यू साताऱ्यामध्ये झाला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच एक खळबळजनक बाबही पुढे आली आहे. जिल्ह्यात कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दोन्ही लाटांमध्ये जास्तच होती. आता पुन्हा जिल्ह्यात कोरोना वाढू लागल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. तसेच उपाययोजना करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे.
दुसरीकडे सिझनल इन्फ्लुएन्झा आजार आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. राज्याचा आरोग्य विभाग सतर्क इन्फ्लुएन्झा आणि कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. स्वयंस्फूर्तीने मास्क वापरावा आठवडी बाजार, एसटी स्टॅंड, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, तसेच मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण 45 रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यापैकी कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. तसेच गृह विलगीकरणात असलेले सहा जण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात बारा जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्यात तीन जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
राज्यसरकारनेही राज्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी नेहमीप्रमाणे जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 248 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 203 बरे झाले आणि एक मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाची सक्रिय प्रकरणे 3532 असल्याचे या प्रेसनोटमध्ये दिले आहे. त्यानंतरची साताऱ्याची अपडेट आहे. त्यामुळे हा आकडा वाढला आहे.