सातारा - दहिवडी (जि. सातारा) येथील दोन कथित देवऋषांच्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे एका चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. अंनिसने याप्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पोलिसांनी दोन देवऋषांना अटक केली आहे.
कुटुंबिय बेपत्ता
बायली सुभाष इंगवले, असे बळी गेलेल्या निष्पाप बालिकेचे नाव आहे. अखेर 14 वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी भूत लागल्याचे सांगून जादूटोणा केल्याच्या आरोपावरून ऊत्तम अवघडे (वय 55 वर्षे, रा. गोंदवले बुद्रक) व रामचंद्र सावंत (वय 45 वर्षे, रा. मोही, माण) या दोन भोंदूंवर जादूटोणा विरोधी कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी देवऋषांवर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या इंगवले कुटुंब बेपत्ता झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
'अंनिस'चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार यांनी सांगितले की, दहिवडी येथील फलटण रस्त्यावरील माऊली मंगल कार्यालयाजवळ काही फिरस्त्या लोकांची वस्ती आहे. या वस्तीवरील बायली सुभाष इंगवले या चौदा वर्षीय मुलीचे डोके सतत दुखत होते. तसेच तिला तापही आला होता. तिच्यावर वडूज येथील एका डॉक्टरकडे उपचार करण्यात आले होते. वैद्यकीय उपचारानंतरही मुलीच्या पालकांनी बायलीला गोंदवले येथील उत्तम अवघडेकडे नेले. त्याने 'तुमच्या घराच्या आसपास बारव आहे. तेथील भूत मुलीला लागले आहे. अमावस्येपर्यंत ठीक होईल,' असे सांगून मंत्रतंत्र करून त्यांना परत घरी पाठवले. त्यानंतरही सायंकाळी जास्त त्रास झाल्याने बायलीला मोही गावच्या रामचंद्र सावंत या देवऋषीकडे नेण्यात आले. त्यानेही बारवीतील भूत लागले आहे. पौर्णिमेपर्यंत देव बांधले आहेत आणि ते ठीक होणे खूप कठीण आहे. 20 तारखेच्या रात्री बारा वाजेपर्यंत बायलीला भयंकर धोका आहे, असे सांगून मंत्रतंत्र व अंगारे धुपारे करून परत पाठवले.
बिनबोभाट पुरला मृतदेह
शनिवारी 20 तारखेच्या रात्री घरातील सर्व जण बायलीला गराडा घालून काय होत ते केवळ बघत बसले. बायली शांत बसली होती व तिचे हातपाय थरथर कापत होते. पण, तरीही सगळ्यांच्या नजरा घड्याळाच्या काट्यांकडे होत्या व सर्वजण बारा वाजण्याची वाट पाहात होते. रात्री बाराला पाच मिनिटे कमी असताना बायली निपचित पडली व तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देवऋषीने सांगितल्याप्रमाणे खरोखरच भूताने बायलीला नेले, असा समज करून कुटुंबीयांनी काहीही बोभाटा न करता बायलीच्या मृतदेहाचे जवळ असलेल्या ओढ्याच्या शेजारी दफन केले.
कुटुंबियाचा थंडा प्रतिसाद
ही घटना सातारा जिज्ञासा ग्रुपचे सदस्य नीलेश पंडित यांनी दहिवडीच्या सुनील काटकर यांना सांगितली. काटकर यांनी ही माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना दिली. समाजात नाचक्की होईल, तसेच देवऋषीच्या भीतीने या मुलीच्या कुटुंबीयांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांना भेटण्यास नकार दिला व आमची काहीही तक्रार नाही, असे सांगितले. संबंधित मुलीचा मामा पोलीस दलात कार्यरत आहे. त्याच्याशी चर्चा करून घडलेली घटना जादूटोणा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. कुटुंबातील कोणी तक्रार दिल्यास देवऋषींना अटक करता येईल व पुढील घटना टाळता येतील, असे सांगून तक्रार देण्यास सांगण्यात आले. पण, त्यांनीही तक्रार दिली नाही, असे पोतदार यांनी सांगितले.
दोन भोंदू अटकेत
'अंनिस'ने जिल्हाधिकाऱ्यांपुढे याप्रकरणाची वाचा फोडल्यानंतर दहिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन भोंदूबाबांना अटक केली. दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक आर.पी. भुजबळ तपास करत आहेत.
हेही वाचा - 'सरपंच झालं की मृत्यू होतो'! 'तिने' दिली अंधश्रद्धेला मूठमाती