सातारा- जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होत असून माण तालुक्यातील 21 जणांनीही कोरोनावर मात केली आहे. यामुळे माणची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे अहमदाबादहून आलेल्या कोरोनाबाधित महिलेशी संपर्क आल्याने माण तालुक्यात विरळी याठिकाणी पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर दिवसेंदिवस तालुक्यात बाधितांची संख्या वाढतच आहे.
आतापर्यंत माण तालुक्यातील विरळी, परतवडी, शिरताव, तोंडले, लोधवडे, भालवडी, दिवड, पिंपरी, म्हसवड, दहिवडी, राणंद, गोंदवले बु, नरवणे, गोंदवले खुर्द, खोकडे, वडजल या १६ गावांमध्ये 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी लोधवडे व भालवडी येथील दोघांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह प्राप्त आला होता. उर्वरीत 29 रुग्णांपैकी 21 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून मुक्त करण्यात आले आहे. सध्या केवळ 8 कोरोनाबाधित रुग्ण सातारा व मायणी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दहिवडी शहरात कोरोनाबाधित डॉक्टरांच्या संपर्कात अनेकजण आल्याने माण तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 49 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मंगळवारी रात्री सर्व 49 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. प्रशासन व आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे माण तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू सुरू असून माणमधील जनतेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बुधवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 866 वर पोहोचली होती. यापैकी 680 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यात 41 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 150 रुग्णांवर सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.