कराड (सातारा) - सातारा जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाने कराडच्या व्यापारी वर्गात नाराजी असून मिनी लॉकडाऊनला व्यापार्यांनी विरोध केला आहे. व्यापार्यांना काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापार्यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून केली. दरम्यान, या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलू, असे आश्वासन पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यापार्यांना दिले.
कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार-
मागील वर्षभर कोरोनामुळे व्यवसायिकांना मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. आता पुन्हा लॉकडाऊनची आपत्ती आली आहे. मंगळवारपासून सातारा जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार्यांनी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. दुकाने बंद राहणार असल्याने व्यापार्यांसह दुकानातील कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. शुक्रवार ते रविवार या दरम्यान दुकाने बंद ठेवण्यास व्यापार्यांचा पूर्ण पाठिंबा होता. असे असताना संपूर्ण आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अचानक जारी करण्यात आल्याने व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच व्यापार्यांना रोज काही वेळ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यापार्यांनी केली.
व्यापार्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात येईल-
शहरातील काही दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार आहेत. त्या ठिकाणी सामाजिक अंतर कसे पाळायचे, असा सवाल करत जादा कामगार असणार्या दुकानांवर कारवाई करण्यात आल्याची तक्रारही व्यापार्यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासनाने गेल्या दोन दिवसात काढलेल्या आदेशांची पाहणी केली. तसेच व्यापार्यांनी प्राधान्याने लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगत व्यापार्यांना लसीकरणासाठी वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांना केली. शहरात सुरू असलेल्या चारपैकी एका लसीकरण केंद्रावर व्यापार्यांच्या लसीकरणाची सोय करण्यात येईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितले.
लसीकरण केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत-
अत्यावश्यक सेवेतील दुकानांबाबत काही सुधारणा करून व्यापार्यांना सवलत देता येते का, याबाबत उद्या (बुधवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिवांशी बोलून चर्चा करतो, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यापार्यांना आश्वस्त केले. तसेच व्यापार्यांनी स्वतःसह दुकानातील कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्याशिवाय दुकाने उघडता येणार नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले. कराड शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष जितेंद्र ओसवाल, नतीन ओसवाल, चेतन मेहता, राहुल शहा, बाळासाहेब भंडारी, मोहसीन बागवान, अशीर बागवान, अंकुर ओसवाल यांनी व्यापार्यांच्या भावना पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडल्या.
हेही वाचा- मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार - गृहमंत्री वळसे पाटील