सातारा - कराड आणि पाटण तालुक्यात आज चौघांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कराड तालुक्यात दोन, तर पाटणमधील एकाचा समावेश आहे. कराड तालुक्यातील 10 महिन्यांच्या बालकासह चार रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. आजच्या चार रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आठ झाली आहे. तर, इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक महिला पूर्ण बरी झाली आहे.
पाटण तालुक्यातील 10 महिन्यांच्या बालकाला न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांना कोरोनाचा संसर्गाचा संशय आला. त्यामुळे बालकाला कराडच्या कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या बालकाचे वडील व काका नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत असतात. त्यामुळे संबंधित बालकाला बाधा झाली असण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली.
कृष्णा हाॅस्पिटलमध्ये 28 वर्षीय पुरुष आणि कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे जिल्ह्यातील चौगांना लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईहून गावी आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या एका नातेवाईकालाही कोरोनाची लागण झाली आहे.
ओगलेवाडी परिसरातील रेल्वे कर्मचारी बंगळुरूहून कराडमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासन संबंधित माहितीची सत्यता पडताळत असून कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू आहे.