कराड (सातारा) - पाटण तालुक्यात कोयना नदीवरील सांगवड पुलाजवळ दोन दुचाकींचा समोरासमोर भीषण अपघात होऊन तीघे जण ठार, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. बबन धोंडीराम पडवळ, भरत रामचंद्र पाटील आणि नितीन बबन तिकुडवे, अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
हेही वाचा - Ajit pawar on Nana Patole : भांड्याला भांडे लागणारच.. नाना पटोलेंच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया
मृत व जखमी पाटण तालुक्यातील - येरफळे (ता. पाटण) येथील बबन धोंडीराम पडवळ (वय 65), भरत रामचंद्र पाटील (वय 40) यांच्यासह अन्य एक असे तिघे जण सेंटरिंगचे काम संपवून मोटरसायकलवरून घरी निघाले होते. त्यांच्या मोटरसायकलची कोयना नदीवरील सांगवड पुलाजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या मोटरसायकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात समोरच्या मोटरसायकलवरील नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिंदेवाडी, ता पाटण) हा तरुण जागीच ठार झाला, तर भरत पाटील, बबन पडवळ, संकेत शिंदे आणि अनिकेत पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना कराडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बबन पडवळ आणि भरत पाटील यांचा मृत्यू झाला. अन्य दोघांवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातात दोन्ही मोटरसायकलींचा चक्काचूर - सांगवड पुलानजिक रात्री झालेल्या अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. नितीन बबन तिकुडवे आणि अनिकेत ज्ञानदेव पाटील हे मोटारसायकलवरून (क्र. एम. एच. 50 ई 7229 ) भरधाव निघाले होते. त्याचवेळी समोरून आलेल्या मोटारसायकलशी त्यांची समोरसमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, मोरटसायकलींचा चक्काचूर झाला.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू - अपघातात नितीन तिकुडवे याचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान भरत पाटील व बबन पडवळ यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली असून उपनिरीक्षक अजित पाटील तपास करत आहे.