सातारा : जिल्ह्यातील कराड-चांदोली मार्गावर लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत रिक्षाला ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात यात्रेसाठी मूळगावी निघालेल्या एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सुरेश सखाराम महारुगडे (वय 39), सुवर्णा सुरेश महारुगडे (34), समिक्षा सुरेश महारुगडे (13), अशी अपघातातील मृतांची तर समर्थ सुरेश महारुगडे (17, सर्व रा. पनुंद्रे, ता शाहूवाडी) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश महारुगडे हे आपल्या कुटुंबासह रिक्षाने पुण्याहून शाहूवाडी तालुक्यातील पनुंद्रे या गावच्या यात्रेसाठी निघाले होते. कराड-चांदोली मार्गावर लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत त्यांच्या रिक्षाला कराडकडे निघालेल्या ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. सर्वजण रिक्षात अडकले. नागरीकांनी धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले.
तिघांचा जागीच मृत्यू : अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अली मुल्ला, हवालदार प्रकाश कारळे, पी. ए. एक्के, बी. बी. राजे अपघातस्थळी दाखल झाले. नागरीकांच्या मदतीने रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. रिक्षातील आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार झाली असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कराड-चांदोली मार्गावर मृत्यूचा सापळा : कोकणात जाणारा कराड-चांदोली मार्ग चार पदरी झाला आहे. मात्र, रस्त्यातील चढ-उतार आणि धोकादायक वळणांमुळे चालकांना वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे अवघड होत आहे. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
आठवड्यापूर्वीच झाला होता अपघात : मागील आठवड्यात मुंबईहून लग्नासाठी आलेली महिला कराड-चांदोली मार्गावरील येळगाव फाट्यावर ट्रॅव्हल्समधून उतरली होती. एक वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन ती रस्ता ओलांडत असताना शिराळ्याकडून आलेल्या भरधाव कारने महिलेला उडवले होते. एक वर्षाची चिमुरडी बाजूला फेकली गेली. ती सुदैवाने बचावली. मात्र, महिला जागीच ठार झाली होती. अपघातानंतर कार न थांबता सुसाट निघून गेली होती.
हेही वाचा : Police Truck News : अपघात केला एका ट्रकने अन् पोलिसात आला दुसराच ट्रक, चर्चांना उधाण