सातारा Theft Of Money : सतीश शंकर ढवळे हे बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबले होते. त्याच्याकडे कांदाविक्रीतून आलेली मोठी रक्कम होती. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांचे पैसे चोरीला गेले. याप्रकरणी त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (theft from Wadhe Fata of Satara)
चहापाणी महागात पडले: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश शंकर ढवळे (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी टेम्पोतून बेळगावला घेऊन गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. सर्वजण टेम्पोमधून बेळगावहून लोणंदमार्गे शिरूरकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबले.
रोकडसह मोबाईल, कागदपत्रेही लंपास : चहापाण्यासाठी टेम्पोतून उतरल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याने १८ लाख ९२ हजार ५०० रुपये रोकड असलेली बॅग टेम्पोतच ठेवली. याचवेळी अज्ञात चोरट्याने बॅगेतील रोकडसह मोबाइल, पाकीट, कागदपत्रेही लांबविली. चहा पिऊन सर्वजण पुन्हा प्रवासाला निघाले. काही अंतर पुढे गेल्यावर बॅगेत पैसे नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पाळत ठेऊन लाखो रुपयांची चोरी: बॅगेतील लाखो रुपयांची रोकड चोरीस गेल्याने शेतकरी आणि त्यांच्या सोबतचे सर्वजण पुन्हा वाढे फाट्यावर आले आणि चहा पिलेल्या ठिकाणी चाैकशी केली. मात्र, पैसे सापडले नाहीत. यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सतीश ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने हे तपास करीत आहेत.
व्यापाऱ्याची पैशाची बॅग चोरीला: चोरीची अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात 25 जुलै, 2023 रोजी भर दिवसा घडली होती. शहरातील क्रांतीचौक भागात सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बँकेतून पैसे काढून जात असलेल्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून, संधी मिळताच तीन लाखांची बॅग पळवतानाची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. ही घटना सोमवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली होती.
हेही वाचा: