सातारा- शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या 15 एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड करुन तब्बल 24 लाख 81 हजार 500 रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा- येस बँकेच्या ग्राहकांना तात्पुरता दिलासा, १८ मार्चला हटणार निर्बंध
चार आरोपींनी त्यांच्याकडील एटीएम कार्डद्वारे एटीएम मशीनच्या कॅश शटरला हाताने उचलून धरुन त्यात तांत्रिक बिघाड केला. त्यातून 24 लाख 81 हजार 500 रुपये 26 जानेवारी ते 2 मार्चदरम्यान काढले. मात्र, याची बँकेच्या सिस्टीमला नोंद गेली नाही. त्यानंतर आरोपींनी आमचे पैसे निघाले नाहीत, असे सांगत बॅंकेत तक्रार केली. त्यांनी रक्कम काढल्याची नोंद न झाल्याने बॅंकेनेही त्यांना पैसे परत दिले. मात्र, हाच प्रकार वारंवार घडू लागल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना संशय आला.
बँक अधिकाऱ्यांनी एटीएम मशीनमधील सीसीटीव्हीची पाहणी केली असता, त्यांना सगळा प्रकार निदर्शनास आला. मात्र, तोपर्यंत बरीच रक्कम बँकेच्या खात्यातून हडप झाली होती. याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय तुकाराम गव्हाणे (रा.सातारा) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली.
...या परिसरातून काढली रक्कम
सातारा शहरात असलेल्या स्टेट बँकेच्या अहिरे कॉलनी, समर्थ मंदिर, बोरावकरनगर, गोडोली, शाहूनगर येथील प्रत्येकी 2, तसेच एमआयडीसी, दुर्गापेठ, सदरबझार, नगरपालिकेजवळ, शाहूपुरी येथील प्रत्येकी एक अशा एकूण 15 एटीएम मशीनमधून 24 लाखांची रोकड या चोरट्यांनी काढली असल्याचे पोलिसांनी सांगितले.