सातारा - विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपकडे माढ्यातून उमेदवाराची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे. शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी निश्चित झाली होती. त्याच वेळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारीसाठी 3 आमदारांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यास व साताऱ्याची जागा निवडून आणण्याचा शब्द दिला होता. त्याबाबत लोणावळा येथे एकत्र बैठक देखील होणार होती, असे आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. यावेळी रामराजे यांच्या राजकीय कारकीर्दीचा अस्त होण्यास सुरुवात झाली असून, लोकसभेपाठोपाठ फलटणमध्ये काय होतं ते तुम्ही पाहाल, असे देखील आमदार गोरे यांनी पत्रकारांना सांगितले
दरम्यान भाजपचे माजी आमदार येळगावकर यांनी 2 दिवसांपूर्वी आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी बोलताना, किंमत नसणाऱ्या बरोबर नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फिरू नये. गुन्हे वाचवण्यासाठी ते भाजपबरोबर आहेत, अशी टीका केली होती. तर यावर आपण प्रतिक्रिया देणार नसून त्यांची पात्रता काय, अशा शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे माजी आमदार दिलीप येळगावकर यांच्यावर टीका केली.
यावेळी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.