कराड (सातारा) - गेली दोन दिवस कोसळणार्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील दाढोली घाटातील रस्ता खचला आहे. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे.
पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र चाफळ, दाढोली परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दाढोली घाटातील रस्ता खचला आहे. चाफळ, दाढोली परिसरातील नागरीकांचे दळणवळण याच रस्त्यावरून सुरू असते. घाटातील रस्ता खचल्याने उंब्रज पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे. रस्ता खचल्यामुळे युध्दपातळीवर रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
पाटण तालुक्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. घाट परिसरातही पावसाचा जोर असल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे दाढोली घाटात रस्ता खचला गेला आहे. त्यामुळे चाफळ परिसरातील दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेत खचलेल्या रस्त्यावरील वाहतूक बंद केली असून डागडुजीचे काम देखील हाती घेतले आहे. धोकादायक रस्त्यावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - बीएचआर प्रकरणाची कारवाई राजकीय हेतूने नाहीच, संशयितांची चौकशी व्हायलाच हवी