कराड (सातारा) - उशीरा कामावर येणार्या लेटलतीफ कर्मचार्यांचे कराड पालिकेत ताशांच्या गजरात आणि पुष्पहार घालून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी स्वागत केले. या उपरोधिक स्वागतामुळे लेटलतीफ कर्मचारी चांगलेच खजिल झाले असून या घटनेची कराडमध्ये जोरदार चर्चा आहे. दरम्यान, कराडमधील अन्य प्रशासकीय कार्यालयातही असे अनेक लेटलतीफ आहेत. त्यांचेही असे स्वागत व्हायला पाहिजे, अशी नागरीकांची भावना आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात सलग दोनवेळा देशात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या कराड नगरपालिकेने तिसर्यांदा देशात प्रथम येण्यासाठी कंबर कसली आहे. नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीला लागले आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर उशीरा येत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी लेटलतीफ कर्मचार्यांचे उपरोधिकपणे स्वागत करून कर्तव्याची जाणीव करून दिली. पालिकेच्या प्रवेशद्वारावर ताशा वादकांना थांबविले. तसेच स्वत: मुख्याधिकारी पुष्पहार घेऊन उभे होते. पालिकेत उशीरा येणार्या कर्मचार्यांचे ताशांचा गजरात आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. हा सत्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा - नववर्षाच्या पूर्वसंध्येला कराडमध्ये ३८६ जणांवर कारवाई, ५९ हजाराचा दंड वसूल
हेही वाचा - बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मागितली खंडणी; तरुणीसह तिघांवर गुन्हा