कराड (सातारा) - कराड तालुक्यातील किरपे गावात बिबट्याने मुलावर ( Leopard in Kirpe Village ) हल्ला करून त्याला ओढत नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला ( Leopard ) पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला आहे. ग्रामस्थांच्या संतापामुळे बिबट्याला तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
मुलावरील हल्ल्यानंतर लावला पिंजरा - कराड तालुक्यातील किरपे गावात दि. 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. मुलाची मान जबड्यात धरून त्याला ओढत नेत असताना मुलाच्या वडीलाने बिबट्याचा प्रतिकार करत मुलाला त्याच्या तावडीतून वाचविले होते. या घटनेमुळे नागरीक संतप्त होते. ग्रामस्थांचा संताप पाहून वनविभागाने किरपे परिसरातील शेतामध्ये पिंजरे लावले होते. त्यातूनही बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला होता. अखेर बुधवारी ( दि.२६ जानेवारी ) पहाटे एका पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाला.
नागरीकांच्या संतापामुळे बिबट्याला तातडीने हलविले - किरपे गावातील मौटी नावाच्या शिवारात नारायण मंदिराजवळ वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वन अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो, हे लक्षात घेऊन वनविभागाने संभाव्य धोका टाळण्यासाठी पिंजर्यातील बिबट्याला तातडीने तेथून हलविले.
बिबट्याच्या वावरामुळे ऊसतोडी बंद - एक बिबट्या जेरबंद झाला असला तरी शिवारात अन्य बिबट्यांचे देखील दर्शन होत आहे. त्यामुळे या परिसरातील ऊसतोडी बंद आहेत. पिंजर्यात जेरबंद झालेला बिबट्या हा मुलावर हल्ला केलेलाच आहे की दुसरा, याबद्दल वनविभागाकडून ठोस माहिती मिळू शकलेली नाही. आता आसपासच्या साजूर, तांबवे, या गावांमध्येही बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे अनेक बिबटे या परिसरात वावरत असल्याचे स्पष्ट होत आहे.