सातारा - पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने सातारा-लातूर महामार्गालगतच्या शेतजमिनीत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. साचून राहिलेल्या पाण्यातील पिके कुजून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच नव्याने पीक पेरणी करण्यासाठीदेखील अडचण निर्माण झाली आहे. 'शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून तयार होणाऱ्या महामार्गामुळे नेमका कुणाचा उद्धार होणार आहे', असा सवाल संतप्त शेतकरी करत आहेत.
दळणवळण सुधारणा करून देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षात सर्वत्र महामार्गाच्या माध्यमातून शहरे जोडण्याचे काम सुरू आहे. सातारा-लातूर महामार्गाचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना रस्त्यालगतच्या शेतजमिनींचा कसलाच विचार केला जात नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. रस्त्यालगतच्या शेतजमिनीत साचणारे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे सर्व मार्ग महामार्गामुळे बंद झाले आहेत. परिणामी, या शेतजमिनीत नेहमीपेक्षा जास्त पाणी दीर्घ काळासाठी साचून राहिले. पाणी साचल्याने या शेतजमिनींची प्रत खालावली असून त्या कवडीमोल होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा - लातुरातील शेतकरी संभ्रमात; मदत त्वरित द्या, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही
माण, खटाव, कोरेगाव, सातारा या तालुक्यांमध्ये या रस्त्याचे काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. हा महामार्ग सर्वत्र साधारणतः समांतर पातळीत करण्याचा प्रयत्न रस्ते विकास महामंडळाने केला आहे. त्यासाठी अनेक ठिकाणचे उंच भाग फोडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणचा रस्ता वर उचलून घेण्यात आला आहे. वर उचललेल्या रस्त्यालगतचा भाग यामुळे खूप खोलगट झाला आहे. परिणामी रस्त्यावर पडणाऱ्या पाण्याचा निचरा या भागात झाला.