सातारा - महाबळेश्वर - पंढरपूर या राज्यमार्गावर विखळे (ता. खटाव) येथे दुचाकी व कारचा अपघात झाला आहे. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. एका मृतासह सर्व जखमी लातूरचे रहिवासी आहेत.
मृतात लातूरच्या एकाचा समावेश -
मृतात मायणी येथील दुचाकीस्वार युवक व कारमधील लातूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, विखळे गावच्या देशमुखवस्ती नजीक विखळेकडून मायणीकडे सुरज राजाराम माळी हा युवक दुचाकीवरुन चालला होता. यावेळी कोल्हापूर येथे देवदर्शन घेऊन सय्यदपूर (ता.देवनी,जि. लातूर) कडे भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार सुरज राजाराम माळी (वय २७ रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) व कार मधील संतोष किसनराव बिरादार (वय ४० रा.सय्यदपूर जि-लातूर) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
चौघे गंभीर -
मोटारचालक महेश जळकुटे, जोतिराम बिरादार, सौदागर बिरादार, दत्तात्रय बिरादार (रा. सय्यदपूर ता.देवनी, लातूर) हे गंभीर जखमी झाले. त्यांना सातारा येथे इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संदीप बिरादार रा.सय्यदपूर हे किरकोळ जखमी झाले आहेत. मायणी येथील मृत युवक सुरज राजाराम माळी याच्या अकाली निधनाने मायणी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या अपघाताची नोंद मायणी पोलीस दुरक्षेत्रात झाली आहे. उपनिरीक्षक शहाजी गोसावी पुढील तपास करत आहेत.