सातारा - गेले काही दिवस खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आज सातारा शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उदयनराजेंची भेट घेतली असून त्यांना भाजपमध्ये न जाण्याची विनंती केली आहे. या संदर्भात दोघांमध्ये अर्धातास चर्चा सुरू होती.
या चर्चेत राज्यातील सर्व नेते भाजप-सेनेत जात असून जनसामान्यांमध्ये स्थान असणारे नेतेच जर असे निर्णय घ्यायला लागले तर सर्व सामान्यांच्या आवाजाचा वाली कोण? हा प्रश्न राजू शेट्टींनी उपस्थित केला. मजबूत विरोधी पक्षनेत्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे. आज ती पोकळी दिसून येत आहे. जनसामान्यांचा आवाज उठवणारे काही मोजकेच खासदार आहेत. विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत. त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ नका, अशी विनंती राजू शेट्टींनी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी अजून तसा निर्णय घेतला नसल्याचेही शेट्टींनी स्पष्ट केले.