सातारा - शाहूनगरमधील एका बंद फ्लॅटमध्ये लक्ष्मी तानाजी कांबळे (वय ४०, रा. शेंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) या महिलेचा गुरुवारी रात्री आठच्या सुमारास मृतदेह आढळून आला. यासंबंधी महिलेचा घातपात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा - शाळकरी मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार; नराधम गजाआड
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कांबळे या दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात आल्या होत्या. त्यांची दोन मुले आणि सासू गावाकडे वास्तव्यास आहेत. साताऱ्यातील शाहूनगरमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन त्या राहत होत्या. त्या रोज सेंटरिंगच्या कामावर जात होत्या. दोन दिवसांपासून त्यांचा फ्लॅट बंद होता. गुरुवारी सायंकाळी फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी शहर पोलिसांना याची माहिती दिली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजाला आतून कडी लावली नव्हती. पोलीस फ्लॅटमध्ये गेल्यानंतर लक्ष्मी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.
मृतदेहाच्या अंगावर जखमा नाहीत. मात्र, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप समोर आले नाही. मात्र, त्यांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच यातील वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक एस. के. मोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - औरंगाबादच्या बेगमपुरा पोलिसांवर आरोपी सोडून फिर्यादीला शोधण्याची वेळ