सातारा: खासदार श्रीकांत शिंदे यांचाच मतदार संघ राहिल का नाही, त्याची चिंता आहे. भारतीय जनता पार्टी तो मतदार संघ काढून घ्यायला टपून बसली आहे, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पाटण तालुक्यातील मल्हारपेठच्या महाप्रबोधन रॅलीतील सभेत ते बोलत होते. मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली म्हणून तुम्ही निवडून आलात. मुळात येत्या निवडणुकीत पाटणची जागा तुम्हाला लढवायला तरी मिळेल का इथून किस्सा चालू आहे, अशी गुगली टाकत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाईंचे टेन्शन वाढविले आहे.
इलाका तुम्हारा और धमाका हमारा: आमदार शंभूराज देसाई यांचा खरपूस समाचार घेताना सुभाष अंधारेंनी चौफेर टोलेबाजी केली. त्या म्हणाल्या की, अपना भी एक उसूल है की उसके इलाके मे घुसके बात करने का. इलाका तुम्हाला और धमाका हमारा. उध्दव साहेब आणि आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार सोडला आहे. तो विचार जिवंत ठेवण्यासाठी आम्ही गुवाहाटीला गेलो, असे शंभूराज देसाई म्हणतात. गुवाहाटी, सूरतमध्ये काय शिवसेनेची शाखा काढायची होती? काढली का? जर विचार जागवायचा होता तर जे. पी. नड्डा महाराष्ट्रात येऊन शिवसेना को हम खतम कर डालेंगे म्हणाले होते तेव्हा शंभूराज देसाईंची दातखीळ बसली होती का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तसेच मातोश्री आणि शिवसेनेकडे वाकडी नजर करणार्यांचा चक्रवाढ व्याजासह हिशोब केला जाईल, असा गर्भित इशारा अंधारेंनी दिला.
आजोबांचा विचार तरी कळला का?: सुषमा अंधार म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आजन्म काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखली. स्वत:चे मुल्याधिष्ठीत राजकारण डागाळणार नाही, याची काळजी घेतली. त्यासाठी खुर्चीला लाथ मारली. शंभूराज देसाई तुम्ही तुमच्या आजोबांच्या विचारांचे तरी झालात का? त्यांचा विचार तरी तुम्हाला कळला का? विचार कळला असता तर शब्दाला जागणे काय असते, ते कळले असते. ज्या आदित्य ठाकरेंवर तुम्ही बोलत आहात, त्या 32 वर्षाच्या पोराने तुमची बत्तीशी बंद करून टाकली आहे, तो युवक आपल्या आजोबांच्या विचारांना जागत आहे. आजोबांनी लावलेल्या शिवसेना नावाच्या रोपट्याचा वटवृक्ष करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत आहेत. तुम्ही मात्र आजोबांच्या नावाला कलंक लावत आहात, असा घणाघात सुषमा अंधारेंनी केला.
महाप्रबोधन यात्रेचा हेतू: अंधारे पुढे म्हणाले की, खोकेवाल्यांचे कपट-कारस्थान आणि षडयंत्र उघडे पाडणे हाच महाप्रबोधन यात्रेचा हेतू आहे. यवतमाळच्या सभेत सूत्रसंचालकाने एकनाथ शिंदेंचा उल्लेख अनाथांचा नाथ केला आणि व्यासपीठावरील लोकांनी टाळ्या वाजवल्या. ज्यांना आई-वडील नसतात त्यांना अनाथ म्हणतात. किती अंधभक्ती असावी, किती लाचारी पत्करावी? जिवंत असताना आई-बाप मारून टाकून स्वत:ला अनाथ म्हणायचे? असा बोचरा सवाल सुषमा अंधारेंनी केला.
निष्ठावंत कमवू शकणार नाही: आमची संख्या कमी असली तरी ती खोक्यांवर निष्ठा बदलणारी नाही. बाळासाहेबांच्या रूद्राक्ष तुलेतील रूद्राक्ष गळ्यात बांधणारा आणि शिवसेनाप्रमुखांशी बोललेल्या फोनचे एसटीडी बील लॅमिनेशन करून ठेवणार्यांसारखे निष्ठावंत शिवसैनिक आमच्याकडे आहेत. खोके खर्चून सुध्दा तुम्ही असे शिवसैनिक कमवू शकणार नाही, असा टोला सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंना लगावला.
हेही वाचा : Naresh Maske on Ajit Pawar : नरेश म्हस्केंची अजित पवारांवर खोचक टीका, म्हणाले, 'स्वतःचे ठेवायचे झाकून...