सातारा: दोन मित्रांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Suicide by hanging of two friends in Shirwal) सातारा जिल्ह्यातील शिरवळ मधून समोर आली आहे. या घटनेने शिरवळ परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांनीही नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला होता. विजय दिलीप माने (वय 22) आणि शुभम प्रदीप हगवणे (वय 19), अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, विजय माने याचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले होते. त्यामुळे या दोन्ही घटनांमागील कारणांचा शिरवळ पोलीस तपास करत आहेत.
शुभम हगवणे या तरुणाने सटवाई कॉलनीतील पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली, तर विजय माने याने राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार दुपारी साडे तीनच्या सुमारास उघडकीस आला. दोन्ही मित्रांनी आपापल्या घरी गळफास घेत जीवन संपवले. परंतु, विजय माने याचे दोन्ही हात पाठीमागे बांधलेले आढळून आल्याने लखन बबन जाधव (रा. तानाजी चौक, शिरवळ) यांनी आपल्या फिर्यादीत संशय व्यक्त केला आहे. एकाच वेळी दोन मित्रांनी आत्महत्या केल्याने या घटनांमागील कारण शोधण्याचे आव्हान शिरवळ पोलिसांसमोर आहे.