सातारा - कृष्णा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कंत्राटी पद्धत बंद करून सर्व कर्मचार्यांना कारखान्याच्या मस्टरवर आणल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात सर्व कामगारांच्या पगारात सरसकट 900 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर 2016 मध्ये कामाच्या प्रकारानुसार 800 ते 2000 रुपयांची वाढ झाली. सर्व कर्मचार्यांना प्रॉव्हिडंट फंडसह अन्य सुविधांचा लाभ मिळू लागला. कुशल कामगारांच्या पगारातही वाढ केली आहे, असे ते म्हणाले. आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही; तर संचालक मंडळाची मुदत संपण्याआधी कारखान्याच्या एकाही कामगाराचा पगार 10 हजाराच्या खाली नसेल, अशी ग्वाही संचालकांनी दिली.
यंदाच्या गळीत हंगामात उत्पादन केलेल्या सहा लाख 35 हजार साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी डॉ. भोसले बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, अॅड. बी. डी. पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, दयानंद पाटील तसेच धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील उपस्थित होते.
महापुराचा फटका बसल्याने गळीत हंगाम जवळपास एक महिना उशीराने सुरू झाला. उशीरा हंगाम सुरू होण्याची गेल्या 30-40 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे, असे भोसले म्हणाले. सध्या साखरेचे भाव पडले असून, गेल्या दोन वर्षांपासून साखर उद्योगात मंदीचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून सरकारने साखर निर्यातीसाठी सहकार्य करण्यास प्रारंभ केल्याचे त्यांनी सांगतिले. या स्थितीतून लवकर बाहेर येण्यासाठी सरकारने साखर निर्यातीच्या धोरणाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.