सातारा - वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्यामुळे पाटण तालुक्यातील घरांचे तसेच फळबागांचे नुकसान झाले आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश त्यांनी पाटणचे प्रातांधिकारी, तहसीलदार आणि कृषी विभागाला दिले.
तारळे (ता. पाटण) परिसरातील नुकसान झालेल्या गावांना देसाईंनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. घोट व मरळोशी या गावांना भेटी देऊन देसाईंनी नुकसानाची माहिती घेतली. यावेळी महसूल, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
देसाई यांच्या सूचनेनुसार नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. मेंढोशी, बिबी, धडामवाडी, म्हावशी, सुरूल, पिंपळोशी, टोळेवाडी, नारळवाडी, आंब्रुळे, पापर्डे, मुरूड, घोट, ढोरोशी, मरळोशी, जंगलवाडी, धायटी, पाडळोशी, सडावाघापूर, काळोली, मुळगांव, येराड, नेरळे, कवरवाडी, नेचल, गोषटवाडी, किल्ले मोरगिरी, सणबूर या गावांमध्ये घरांचे आणि चाफळ, पेठशिवापूर, किल्ले मोरगिरी, डोंगळेवाडी या गांवामध्ये पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले.